पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती Todays Update

 पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती Todays Update








        पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती बाबत येथे खात्रीशीर दररोजचे अपडेट्स दिले जातीत. पवित्र पोर्टल वर दिलेल्या अधिकृत सूचना आपणास खाली दिनांक निहाय पहावयास मिळतील. त्यामुळे अधून मधून रोज या वेब पेज ला भेट देवू शकता.

Todays Update 8/ 7/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

  • पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे या त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून दिनांक २५/०६/२०२४ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये ३१५० रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे.
  • 'मुलाखती शिवाय' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक २५/०६/२०२४ रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगांमध्ये दर्शविण्यात आलेले होते.
  • मुलाखती शिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक १८० / २०२४ व अन्य संलग्न याचिका प्रकरणी आज दिनांक ०५/०७/२०२४ रोजी सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीमध्ये मा. न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करणेवर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय अभियोग्यता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
  • न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.

Todays Update 26/6/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


Beneficiary List of Horizontal and Other Reservation 

click HERE



रुपांतरीत फेरीसाठी तक्रार निवारण अर्ज download click Here  


पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ नुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारासाठी दिनांक २५/०२/२०२४ रोजी ११,०८५ उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर ६,९८२ शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे.

वरील प्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत. सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

शासनाकडे सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक ०७/०६/२०२४ व १४/०६/२०२४ अन्वये माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाले. माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागविली. जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने शासनाकडे सादर केली. त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रक विभागाने म्हणजेच सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक २५/०६ / २०२४ रोजी माजी सैनिकांची ४८४ पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे.

तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्व-प्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात शासन पत्र दिनांक १०/०६/२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

माजी सैनिक या प्रवर्गासाठी दहा टक्के जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीतच विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीची निकड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारणमध्ये रूपांतरीत करून पदभरती करण्यात येत आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली. ‘रूपांतरित फेरीमध्ये एकूण ५,७१४ रिक्त पदांपैकी ३,१५० पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे. रिक्त राहणाऱ्या २,५६४ पदांच्या विषयांसाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत. शिफारस होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी या गटातील इंग्रजी माध्यम - ७०२. उर्दू माध्यम - ९५. हिंदी माध्यम - ९९. मराठी माध्यम - ७६०. कन्नड माध्यम- ९, अशी एकूण १,६५७ रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे. इयत्ता सहावी ते आठवी या गटातील सर्व माध्यमांची गणित-विज्ञान/ गणित / विज्ञान - १,३८२. सामाजिक शास्त्र- ३ भाषा - ९८ अशी एकूण - १,४८३ रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे.इयत्ता नववी ते दहावी या गटातील सर्व माध्यमांतील १० रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे.

मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक २५३४/२०२४ व २५८५ / २०२४ मध्ये दिनांक ०७/०३/२०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तदनंतर, मा. उच्च न्यायालयात शिक्षक पदभरतीशी संबंधित याचिका दाखल आहेत. यात मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक २७८४ / २०२४, २७५२ / २०२४ व अन्य याचिका दाखल आहेत. सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मा. उच्च न्यायालय मुंबई. खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथील दाखल याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.

शिक्षक पद भरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती (Grievance Redressal and Correction Committee) कडे pavitra2022grcc@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत उमेदवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी. संस्थांनी, संघटनांनीही या ईमेलवर मेल पाठवू नयेत पाठविल्यास असे मेल दुर्लक्षित करण्यात येतील. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये विहित मुदतीनंतर प्राप्त ई-मेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणाली द्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नाही त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये.सदरच्या पदभरती प्रक्रियेत मुलाखती शिवाय भरतीतील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे, राखून ठेवलेली पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे.

स्व-प्रमाणपत्रांमध्ये चुकीची/ अर्धवट / अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये झाली नसेल. अशा व अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्व-प्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

नव्याने जाहिराती घेऊन निवडप्रक्रिया करताना स्व-प्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. 'माजी सैनिक' या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक' यांचेसाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.

निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. आपल्या



Todays Update 11/6/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


  • पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर/ शिक्षक मतदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त झाली आहे.
  • दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल.
  • दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे.
  • त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे.
  • समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये.
  • बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल.


Todays Update 27/5/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमधून मा. भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आलेली होती. दरम्यान विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक २४/०५/२०२४ अन्वये निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. दिनांक २४/०५/२०२४ पासूनच या क्षेत्रासाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, असे आयोगाच्या प्रेस नोट मध्येच स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे.

समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रुपांतरीत करून भरण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहितेमधून वरील नमूद प्रमाणे यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागा संदर्भातील कार्यवाही करण्यास मा.भारत निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत.

काही मंडळी अभियोग्यताधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहेत हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात असताना अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे, चुकीची माहिती पसरवणे व आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे. ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.


Todays Update 15/5/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


  • राज्यातील विधान परिषदेच्या कोकण विभागातील शिक्षक व पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक ०८/०५/२०२४ रोजी प्रसिद्ध झाला होता व तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती त्यातून शिक्षक पदभरती साठी सूट देण्यासाठी शासनाकडे दिनांक १०/०५/२०२४ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
  • दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे असे भारत निर्वाचन आयोगाकडील दिनांक १४/०५/२०२४ रोजीच्या प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक संबंधी आदर्श आचारसंहितेचा अंमल आता लागू राहणार नाही.
  • त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भातील यापूर्वी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सर्व शिक्षणाधिकारी व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात सर्व शिक्षणाधिकारी यांना स्प्रेडशीटद्वारे (Google Sheet) माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून याचा आढावा एक आठवड्यात आयुक्त स्तरावरून घेतला जाणार आहे.
  • शिक्षक भरती गतीने व्हावी या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून या संदर्भात राज्यस्तरावरून दिनांक १०/०५/२०२४ रोजी सर्व शिक्षणाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये काही जिल्ह्यांनी त्यांच्याकडील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत अडचणी उपस्थित केल्या होत्या. त्या सोडविण्यासाठी शासनाकडे अडचणींबाबत करावयाच्या संभाव्य उपाययोजनांचा प्रस्ताव पाठवण्यात येत आहे.
  • संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रशासन स्तरावरून अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत. त्याबाबत ठळक निष्पत्ती घडेल त्या त्या प्रमाणे बुलेटीन निर्गमित केले जात आहे.
  • अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक वेगवेगळे मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. भरती प्रक्रिया न्याय्य व कोणत्याही खोडसाळपणाला थारा न देता पूर्ण करण्यातयेत आहे. त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहावे.
  • ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.


Todays Update 27/4/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


शिक्षक भरती २०१७ साठी सन २०१९ मध्ये जाहिरात दिलेल्या पैकी ज्या जिल्हा परिषदेच्या ५० % रिक्त पद भरतीची कार्यवाही झाली आहे त्या पदभरतीच्या वेळी राखून ठेवण्यात आलेल्या ५० % जागाबाबत शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यास आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आली आहे. यावर शासन स्तरावरून निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.

अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. भरती प्रक्रिया न्याय्य व कोणत्याही खोडसाळपणाला थारा न देता पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहावे.ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.

Todays Update 20/4/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

पवित्र पोर्टल मार्फत दिनांक २५/०२/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन / जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरु करण्यात आली होती.

दरम्यान मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा - २०२४ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले. तथापि, या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत मा.भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.

यासंदर्भात मा. भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणेस परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक १९/०४/२०२४ अन्वये या कार्यालयास कळवणेत आले आहे.

त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.



Todays Update 17/3/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - २०१७ मधील पदभरतीसाठी सन २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीतील दिनांक ०९/०८/२०१९ च्या निवड यादीतील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी दिनांक २९/११/२०२३ रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आला . या राऊंडच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती न देण्याबाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक १४७१८/२०२३ दाखल आहे. या याचिकेत शासनातर्फे शपथपत्र दाखल केले असून विधिज्ञांना आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे व पाठपुरावा करणेत येत आहे.. सदर प्रकरण मा. न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून प्रतिक्षाधीन आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - २०२२ नुसार शिक्षक पदभरतीची पहिली यादी दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. सदर निवड यादी विरोधात मा. उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवादाअंती अंतरिम आदेश स्थगितीस नकार देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत. तसेच मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडील याचिकेत दिनांक १५/०३/२०२४ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झाली आहे. मा. न्यायालयाने शिक्षक पदभरतीबाबतचे वरील आदेश

Todays Update 14/3/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

पवित्र पोर्टल द्वारे दिनांक २५.२.२०२४ रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादीसंदर्भात याचिका मा. उच्च न्यायालय मुंबई व मा. खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेल्या आहेत.

या संदर्भात मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंती मा. उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत. (प्राप्त दि. १२ मार्च २०२४)

न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही होईल.

तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जांची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळविण्यात येत आहेत.

तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमून दिलेल्या ई-मेल ऍड्रेस चाच वापर करावा.


Todays Update 8/3/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

दिनांक ०७/०३/२०२४


  • २०१७ च्या भरतीतील राखून ठेवलेल्या जागांच्या संदर्भात न्यायिक प्रकरण सुरू आहे. या प्रकरणात शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. या संदर्भातील वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

• तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये उचित निर्णय घेऊन संबंधिताना कळवले जातील.

प्राप्त ईमेलवर जलद कार्यवाही होण्याचे दृष्टीने पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे विहित नमुन्यात तक्रार करण्यासाठी यापुढे pavitra2022grcc@gmail.com या ईमेल एड्रेस चा वापर करावा. या ईमेल ऍड्रेसवर विहित नमुन्यातील अर्ज व त्याला व्यवस्थित रित्या स्कॅन केलेले पुरावे जोडले असतील तर त्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करून संबंधितास कळवले जाईल. या ईमेल ॲड्रेसवर अन्य कोणतेही ई-मेल पाठवू नयेत.

  • ज्यांनी यापूर्वी अर्ज सादर केले आहेत त्यांनी पुन्हा pavitra2022grcc@gmail.com या ई-मेल वर पाठवू नयेत, पूर्वी पाठविलेले अर्ज विचारात घेतले जात आहेत.

Todays Update 3/3/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

दिनांक ०२/०३/२०२४

१. निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाच्या त्रुटी अथवा अन्य मुद्द्यासंदर्भात तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली असून व्यक्तिगत तक्रारीच्या मुद्द्यांचे निराकरण समिती विविध प्रक्रियेद्वारे करीत आहे याबाबतचे निर्णय संबंधितास कळविण्यात येत आहेत.

२. विहित दिनांकास अर्हता असूनही केवळ अध्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे.

३. मुलाखतीशिवाय मधील शिल्लक पदे, सेमी इंग्रजी रिक्त पदे, उर्दू माध्यमातील रिक्त पदे, तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडील इ ९ वी ते १२ वीची पदभरतीची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येत आहेत.

४. अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण न्यायोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्दयाच्या सोडवणुकीसाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेलवर संपर्क साधावा.

Todays Update 2/3/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

दिनांक ०१/०३/२०२४


१. पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी व नियमवद्ध पद्धतीने कमी वेळात केल्या संदर्भात उमेदवार, त्यांचे पालक, शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. इतकेच नव्हे तर ज्यांची निवड या प्रक्रियेत झाली नाही अशा उमेदवारांनीसुद्धा या प्रक्रियेच्या निष्पक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीवावत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. त्या सर्वांचे प्रशासन आभारी आहे.

२. इत:पर कोणाची पदभरती संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठित केली आहे व त्या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

३. संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठित केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमांवरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे, तक्रार निवारण समितीकडील अर्जांचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागत आहे. प्रशासकीय मुद्द्यांवावत समाज माध्यमांमधून अनाठायी शंका उपस्थित करणे अथवा अन्यप्रकारे अडथळे निर्माण करणे यातून कालापव्यय होऊन पुढील प्रक्रियेमध्ये विलंव होत असल्याचेही नमूद करण्यात येत आहे.

४. वरील वावींमधून वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी (Conversion Round) पूर्वतयारी करीत असून त्यावावतदेखील प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरातलवकर पुढील कार्यवाही करण्याचे नियोजित आहे. यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे.

५. वरील प्रमाणे जास्तीतजास्त उमेदवार विदाऊट इंटरव्यू या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे.

Todays Update २9/२/२०२४

पवित्र पोर्टलचा अधिकृत updated तक्रार अर्ज download करण्यासाठी येथे click करा. 

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


प्राधान्यक्रमाबाबत प्राधान्यक्रम भरण्यावर कोणतीच मर्यादा नव्हती २०० हून अधिक सुद्धा प्रेफरन्स भरलेले आहेत. प्राधान्यक्रम कसे भरायचे याच्या स्पष्ट सूचना प्रेफरन्स भरण्यापूर्वीच दि ५ फेब्रुवारी २०२४ म्हणजेच प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी दिलेल्या आहेत. त्यामुळे गुण व अर्हता याचा मेळ घालूनच निवड यादी तयार झाली आहे.

टीईटी बाबत : TET ही अर्हता परीक्षा आहे हे सर्वश्रुत आहे आणि मूळ जाहिरातीत नमूद आहे. अर्हता परीक्षेत सवलत घेतली की खुल्या जागेसाठी पात्र होत नाही. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने तर निर्णित केली आहेच परंतु महाराष्ट्र शासनाच्या सर्व निवड प्रक्रियांमध्ये अनुसरण्याची कार्यपद्धती आहे. कोणत्याही विभागाची यादी पाहिल्यास ही बाब स्पष्ट होईल.

आरक्षित प्रवर्गाबाबत आरक्षित प्रवर्गातील सवलतीचा लाभ न घेतलेले खुल्यातून आणि लाभ घेतलेले आरक्षित कोट्यातून असे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील अभियोग्यताधारक निवडले गेले आहेत. निवड यादी पाहता एकूण भरतीत मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांची संख्या दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गावर अन्याय झाला आहे. ही बाब वस्तुस्थितीला अजिबात धरून नाही.

खुल्या प्रवर्गाबाबत : या प्रवर्गात ज्या व्यक्तींचा समावेश होणे कायदेशीर अनुज्ञेय आहे त्या सर्वाचा समावेश करण्यात आलेला आहे.

कट ऑफ मार्कांबाबत कट ऑफ मार्क मधील फरकाबाबत आरक्षित प्रवर्गातील सवलतींचा लाभ घेतलेली व्यक्ती त्यांच्या त्यांच्या प्रवर्गात सामावली गेलेली आहे. सवलतीचा लाभ घेतलेले उमेदवार मुळात खुल्या पदावर जाण्यासाठी पात्रच नसतात. त्याठिकाणी आरक्षणाचा लाभ न घेतलेले अथवा मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवार गेलेले असल्याने एखाद्या प्रकरणात कमी अथवा अधिक झालेल्या कट ऑफ ची तुलना करता येणार नाही. अशी बाब अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये होत असते.

बिंदुनामावली बाबत २०१९ पासून बिंदुनामावल्या अद्ययावत नव्हत्या. त्या सर्व पुरेसा कालावधी देऊन व त्यावेळी प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपाचे खंडन करून मागासवर्ग कक्षाकडून विधिवत प्रमाणित करून घेतलेल्या आहेत. त्यावर पुराव्यानिशी कोणताही आक्षेप प्राप्त झालेला नाही. केवळ मोघम आरोप केले जात आहेत. तरीदेखील कोणत्याही शंकेला वाव राहू नये म्हणून १० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत.

तक्रार निवारण : सर्व बाबी कायदेशीररित्या बिनचूक केल्यानंतरही जर काही मुद्दे शिल्लक राहत असतील तर त्यांचे निराकरण करण्याकरता संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठित करण्यात आली आहे. या समितीकडे दाद मागणे शक्य आहे.

पेपर फुटी, घोटाळे इत्यादींमध्ये जर्जर झालेल्या विभागात अत्यंत पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया पूर्ण केल्याची भावना निवड न झालेल्या अनेक उमेदवारांनीसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली आहे.

लवकरच रूपांतरण राऊंड ( conversion round ) बाबतची प्रक्रियासुद्धा काटेकोरपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वरील प्रमाणे सर्व मुद्द्यांचे निरसन होत असताना काही घटक समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती प्रसारित करून. या प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत ही बाब सयुक्तिक नाही.

मुलाखतीशिवाय पदभरतीच्या दिनांक २५/०२ / २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या या निवड यादीमध्ये आरक्षित प्रवर्गातील अनेक अभियोग्यताधारक खुल्या प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत. ज्या अभियोग्यताधारकांनी निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाच्या सवलतींचा लाभ घेतला आहे ते त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत. त्यामुळे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील अभियोग्यताधारकांना त्यांच्या गुण व अर्हता याचा एकत्रित विचार करून सामावून घेण्यात आलेले असल्याने कोणत्याही आरक्षित प्रवर्गावर अन्याय झालेला नाही.

खुल्या प्रवर्गातून निवडले जात असताना संबंधित अभियोग्यताधारकाने आरक्षणाच्या कोणत्याही सवलतीचा लाभ घेतलेला असणे अनुज्ञेय नसल्याचा निर्वाळा मा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिलेला आहे. याबाबत केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे ही धोरण तेच आहे. याबाबी विचारात घेऊन संपूर्ण प्रक्रिया केली आहे.

• आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेतलेले आणि आरक्षणाचा लाभ न घेतलेले यापैकी आरक्षणाचा लाभ न घेतलेल्या उमेदवारांचा वरील न्यायनिवाडे व शासन धोरणानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीचा अधिकार आहे हे पुनरुदृत करण्यात येत आहे.

निवड यादी चे अवलोकन केले असता आरक्षित प्रवर्गातील पात्र अभियोग्यताधारकांचा खुल्या प्रवर्गात झालेला समावेश लक्षणीय असल्याचे दिसून येईल.

Todays Update २8/२/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती याप्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व अभियोग्यताधारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे. तरी देखील यासंदर्भात अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे edupavitra2022@gmail.com या ई-मेलवर तक्रार अर्ज सादर करता येईल. त्याचा नमुना विहित करण्यात आला असून News Bulletin मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या नमुन्यात आपला अर्ज त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल. केवळ या ईमेल ऍड्रेस चाच वापर करावा. त्या ईमेल ऍड्रेसवर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत. तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉटसअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये.


जिल्हा परिषदेकडील बिंदुनामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करुन भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या १० टक्के जागांबाबत संबंधित जिल्हयांकडून अहवाल घेण्यात येत आहेत, काही जिल्हयाचा अहवाल अप्राप्त आहे त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित रिक्त १० टक्के जागांबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल.


• अनुसूचित जमातीच्या पेसा क्षेत्रातील १३ जिल्हयातील रिक्त जागांबाबत उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी यापुर्वीच पूर्ण झाली आहे. परंतु मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका दाखल असल्याने पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची पदभरती पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्यानंतर नवीन पदांवर रूजू होता येईल तसेच पेसा क्षेत्राबाबत मा. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. यास्तव अनुसूचित जमाती प्रवर्गात नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्हयाकडे उपस्थित राहून करून घ्यावी.


• भाषा विषय - इंग्रजी साठी निवडलेल्या या शिक्षकांना त्यांचे विषय शिकवावयाचे आहेत. उर्दू माध्यमाची गरज असेल तेव्हा शाळेत उर्दू शिक्षक उपलब्ध आहेतच. केवळ एक शिक्षक अन्य माध्यमातील असणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होतोय, त्यामुळे भाषा विषय अथवा सेमी इंग्रजी यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नाही.


• साधन व्यक्ती या पदासाठी शासन पत्र दिनांक २५/०१/२०२४ नुसार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेस्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील यथोचित निर्णय घेण्यात येईल.


• याभरतीमध्ये रिक्त राहिलेली पदे ( माजी सैनिक, अंशकालीन इ.) याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील तेथून पुढे टप्पा-२ मधील जाहिराती असतील.


शासन निर्णय दिनांक १० / ११ / २०२२ मधील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येतील. पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील.

Todays Update २7/२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

दिनांक २6/०२/२०२४



• पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

• सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या अभियोग्यताधारक यांना त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळविले जाईल त्यानुसार सर्व संबंधितांनी त्या त्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करावे.

व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होवू नये यास्तव आरक्षणाचे कटऑफ व विषयाचे कटऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरवातीस दर्शविण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांची स्थिती पाहणे सुकर झाले आहे.

• सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व अभियोग्यताधारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे. तरी देखील यासंदर्भात अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ई-मेलवर विहित नमुन्यात (लवकरच पुरविला जाईल) अर्ज करून त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल. केवळ त्या ईमेल ऍड्रेस चाच वापर करावा. त्या ईमेल ऍड्रेसवर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत. तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉटसअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये.

खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कटऑफ खुल्या पेक्षा काही ठिकाणी जास्त आल्या बाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करीत आहेत

• या संदर्भात पुढील प्रमाणे वस्तुस्थिती आहे. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्र. ११२५४/२०१९ मधील सिविल अर्ज क्र. ८२५९/२०१९ मध्ये दि. २४/१०/२०१९ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता धारण करण्यामध्ये त्या त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनारक्षित (खुला) प्रवर्गासाठी पात्र ठरत नाहीत.

• केंद्र शासनाच्या दि ०१/०७/१९९८ व दि. ०४/०४/२०१८ च्या ज्ञापनामध्ये देखील अशाप्रकारे सवलतीचा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र ठरल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद विहित आहे. राज्यशासनाच्या विविध प्रकारच्या उदा. तलाठी भरती. ग्रामविकास विभागाकडील विविध पदांच्या पदभरतीमध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल तर खुल्या प्रवर्गातून अन्यथा त्या त्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरविण्याची तरतूद आहे. या व अन्य

प्रचलित तरतुदी विचारात घेण्यात आल्या आहेत. या शिक्षकभरतीसाठी टीईटी ही अर्हता परीक्षा असल्याने त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झाले असेल तर जरी त्यांना टी ए आय टी या परीक्षेत जास्त गुण असले तरी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे वरील विविध न्याय निवाडे व शासनाचे आदेशानुसार त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केले गेलेले आहे. त्यामुळे कट ऑफ मध्ये हा फरक दिसतो परंतु तो पूर्णपणे विधीसंमत आहे.

• मराठी, उर्दु वा अन्य माध्यमांमध्ये इ. ६ वी ते इ ८ वी / इ ९ वी ते १० वी / इ ११ ते इ १२ वी या गटातील भाषा विषयाच्या अभियोग्यताधारकाची शिफारस करताना शैक्षणिक अर्हतेतील त्याची पदवी / पदव्युतर पदवी ज्या विषयातून झाली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित अभियोग्यताधारकांची निवड होवू शकते.

• मराठी, उर्दु वा अन्य माध्यमांमध्ये सेमी इंग्रजी साठी अभियोग्यताधारक यांची शिफारस करताना संबंधित अभियोग्यताधारक यांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातील आवश्यक ही बाब विचारात घेवून करण्यात आलेली आहे. यास्तव कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी संबंधित अभियोग्यताधारकांची निवड होवू शकते.

गुणवत्तेनुसार अभियोग्यताधारक यांचे निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला वा स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचे पद उलपब्ध असेल तर अभियोग्यताधारक यांची शिफारस होते त्यामुळे काही विषयांच्या बाबतीत कटऑफ गुण कमी आल्याचे दिसत आहे.

काही प्रवर्गाच्या बाबतीत जाहिरातीतील त्यांच्या प्रवर्गासाठी रिक्त असेलेल्या पदांपेक्षा अधिक पदांवर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याचे दिसून येत आहे.

• मुलाखतीशिवाय पदभरतीतील माजी सैनिक, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील योग्य अभियोग्यताधारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहत असल्याचे दिसून येत आहे. समांतर आरक्षणाबाबत प्रचलित तरतूदी विचारात घेवून शासनाच्या मान्यतेनंतर यथोचित निर्णय घेण्यात येईल.

• मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांना मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक ७६२७ / २०२३ मधील आदेशानुसार प्रचलित तरतूदी विचारात घेता १:१० या मर्यादेत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत वेळोवेळी अपडेट देण्यात येतील.

• वस्तुस्थितीची व्यवस्थीत माहिती न घेता अभियोग्यताधारकांना संभ्रमित करून याचिकांसाठी वर्गणी गोळा करणे हा एक आक्षेपार्ह प्रकार या भरतीप्रकिया दरम्यान दिसून आलेला आहे. याचिका करणे हा जरी हक्क असला तरी तत्पूर्वी कायद्यातील तरतुदींची पडताळणी स्वतः अभियोग्यताधारकानी करावी. सध्या सर्व बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्याची शहानिशा करूनच पुढील निर्णय घ्यावेत.

Todays Update २6/२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

दिनांक २5/०२/२०२४

• पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२ / २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

• निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास सर्वांना शुभेच्छा.

निवडयादी सर्व जिल्ह्यांची एकत्रित  download करण्यासाठी येथे click करा.

Beneficiary List of Horizontal and Other Reservation click Here

(वरील link ला किंवा येथे click केल्यास reservation निहाय  व वरच्या download tab मध्ये सर्व निवड याद्या download साठी उपलब्ध आहेत.)

Todays Update २5/२/२०२४


दिनांक : २५ / ०२ / २०२४

उमेदवारांसाठी सूचना


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२२ नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत.

१. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून दिनांक ०५/०२/२०२४ ते १४/०२/२०२४ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.

२. त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत त्यांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे.

३. मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

४. उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे.

५. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्यांना लॉगीन केल्यानंतर अँप्लिकेशन फॉर्म (Application Form) मेनू अंतर्गत अँप्लिकेन्ट रिकमंडेड स्टेटस (Applicant Recommended status) यावर क्लिक केल्यावर सलेक्ट राऊंड (Select Round) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून फेज-१ (Phase-1) यानंतर सलेक्ट इंटरव्हिव टाईप ( Select Inteview Type) या ड्रॉपडाऊन (Dropdown ) मधून विदाआऊट इंटरव्हिव (without Interview) मेनू निवडावा. त्यानंतर सबमिट (submit) वर क्लिक करावे

त्यानंतर व्हिव रिकमंडेड इन्स्टिटयूट लिस्ट (View Recommended Institute list) या मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास, सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. व्हिव प्रेफरेन्स वाईस स्टेटस (View Preferencewise status) यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल.

६. नियुक्ती प्राधिकारी / व्यवस्थापन यांनादेखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत सूचना देण्यात येत आहेत.

७. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

८. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

९. उमेदवारांच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर “तक्रार निवारण व दुरुस्ती समिती" स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी आपणास edupavitra२०२२@gmail.com या ईमेल वर सबळ पुराव्यांसहित अर्ज सादर करता येईल.

१०. उमेदवारांना अन्य अडचणी आल्यास edupavitra2022@gmail.com या email वर संपर्क साधता येईल.

११. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावड्या उडवून प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ते सर्व प्रयत्न सनदशीर मार्गाने व ठामपणे प्रशासनाने हाणून पाडले आहेत.

१२. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. शिक्षक होणे ही आयुष्यातील सर्वोत्तम घटना आहे, याची जाण ठेवावी व सेवा निवृत्तीपर्यंत जतन करून ठेवावी.


Todays Update २४/२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक पदभरती व याद्या संदर्भात अनिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवरील “One and only” न्यूज बुलेटीन हाच एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे.

• सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना दूर करावे. याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात आहे.

पूढील २-३ दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल. तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तयार ठेवणे व तत्सम कामे करावीत किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे.







Todays Update २3/२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

• पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतिपथावर आहे. सद्यःस्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी /अडचणी समोर येताना दिसून येत नाहीत.

• दिनांक २१/०२/२०२४ रोजीच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत. त्याची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्या वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळात होणार आहे.

• याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही गाऱ्हाणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 'तक्रार निवारण व दुरूस्ती समिती गठीत करण्यात आली आहे. त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल व निराकरण केले जाईल.

सन २०१९ च्या भरतीच्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यास दि. ३० जून, २०१९ मुदत होती व दिनांक ०९/०८/२०१९ रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. म्हणजेच ४० दिवसांचा कालावधी लागला होता. यावेळी त्या तुलनेत तिपटीहून अधिक पदांची भरती असूनही शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच या याद्या प्रसिध्द होतील. त्यामुळे या संदर्भात अवाजवी उत्कंठा दर्शवू नये.

• अभियोग्यताधारकांनी शिक्षक पदभरती-२०२२ साठी वापरात असलेल्या edupavitra2022@gmail.com या ईमेलवरच त्यांची विहित प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावीत. निवेदनासंबंधीचे नमुना प्रपत्र लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठविल्या गेलेल्या तसेच विहित नमुन्यात नसलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. याबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात येईल.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .