शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएमपी (Cash Management project)/ ई- कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय दि 4 जानेवारी २०२४ नुसार
प्रस्तावना
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका/नगरपालिका यांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन देयकास कोषागार कार्यालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर कोषागार कार्यालयाने तयार केलेले धनादेश अथवा EFT शाळांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येऊन तदनंतर अशासकीय वजाती कपात करुन, वेतनाची रक्कम संबंधितांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येत असल्याने, संबंधितांना वेतन अदा होण्यासाठी (Downward Movement) विलंब होत असे. त्यामुळे सदर विलंब टाळण्यासाठी संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा जिल्हा परिषद, महानगरपालिका/नगरपालिका यांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन व भत्ते इलेक्ट्रॉनिक्स निधी वितरण प्रणाली (ECS/EFT/NEFT) द्वारे अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२.जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अदा करण्यात येतात. उक्त नमूद शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची वेतन देयके तयार करुन ती मान्यतेसाठी कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्याची पद्धती / टप्पे भिन्न असल्याने, शासनामार्फत वेळच्यावेळी वेतन अनुदान अदा होऊनही सदर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये वेतन जमा होण्यास विलंब होत होता. त्यामुळे, सदर वेतन देयके ऑनलाईन तयार करुन कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्याकरिता (Upward Movement) वित्त विभागाने लागू केलेल्या “सेवार्थ” प्रणालीच्या धर्तीवर संदर्भाधीन क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये शालार्थ ही संगणकीय प्रणाली लागू करण्यात आली.
३. आदात्यांना सत्वर रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याचे निर्दशनास आल्याने व कोषागारातून होणारी प्रदाने, आहरण व संवितरण अधिका-यांमार्फत ई-प्रदान प्रणालीचा वापर करुन थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करणे शक्य असल्याने वित्त विभागाने संदर्भाधीन क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई, कोषागार कार्यालय, नागपूर व मराठवाडा विभागातील कोषागार कार्यालये वगळता सर्व कोषागार/उपकोषागार यांच्यामार्फत होणारी सर्व प्रदाने स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून पुरविलेल्या सीएमपी (CMP)प्रणालीमार्फत करण्याचा निर्णय घेतला असून, सदर प्रणालीसंदर्भात आहरण व संवितरण अधिकारी तसेच कोषागार कार्यालये यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती निश्चित केली आहे. तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.५ येथील शासन निर्णयान्वये अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व कोषागार कार्यालय, नागपूर यांच्याकडील सर्व प्रकारची प्रदाने आहरण व संवितरण अधिकारी यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याबाबत ई- कुबेर प्रणाली लागू करण्यात आली असून, त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तसेच संदर्भाधीन क्र.६ येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने आहरण व संवितरण अधिकारी यांनी तयार केलेल्या देयकासोबतच्या प्राधिकारपत्राच्या आधारे कोषागार कार्यालयाकडून त्रयस्थ आदात्याच्या खात्यात सीएमपी (CMP) प्रणालीद्वारे थेट रक्कम अदा करण्यात येत असल्याने, सदर कार्यवाही करताना आहरण व संवितरण अधिकारी तसेच कोषागार कार्यालयांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत काही आवश्यक सुचना निर्गमित केल्या आहेत. ४. उपरोक्त बाबी लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाचे प्रदान सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय-
1.जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी, २०२४ पासूनचे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत / ज्या जिल्ह्यांत ई-कुबेर (E-Kuber) कार्यरत आहे, त्या जिल्ह्यांत ई- कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२.भारतीय स्टेट बँकेच्या सीएमपी (CMP) प्रणाली व ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत प्रदानासंदर्भात “परिशिष्ट अ" मध्ये जोडण्यात आलेल्या सूचना देण्यात येत आहेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि संबंधित कोषागार अधिकारी त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व अनौपचारिक संदर्भ क्र. २०२१/२२४ / कोषा प्रशा-५, दिनांक २/१२/२०२१ व ग्रामविकास विभागाच्या सहमतीने व अनौपचारिक संदर्भ क्र.१/२०२३ / वित्त-६, दिनांक २५/११/२०२३ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०१०४१८३०५४१३२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .