दिपावली सण" एक सांस्कृतिक वारसा जपण्याबाबत..

दिपावली सण" एक सांस्कृतिक वारसा जपण्याबाबत



शिक्षण आयुक्त श्री सुरज मांडरे यांनी दि 7 नोव्हेंबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि...

आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे. दरवर्षी आपण सर्वजण दिपावली / दिवाळी हा उत्सव/सण मोठया उत्साहाने साजरा करीत असतो. हा सण ज्ञानाचा (प्रकाश) अज्ञानावर ( अंधकार ) विजय म्हणून प्रतित होतो. दिवाळीचे स्वागत आकाशकंदील, किल्ले, नवनवीन फराळाचे पदार्थ, सुशोभित रांगोळी अशा अनेकविध पध्दतीने करण्याची आपली परंपरा आहे.

महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पुर्वजांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे. किल्ला तयार केल्यामुळे आपल्या ऐतिहासिक व भौगोलिक माहितीबरोबरच बांधकाम शास्त्राची देखील ओळख मुलांना होते. मुलांच्या कल्पना शक्तीला चालना मिळून टाकाऊ वस्तूचा वापर योग्य पध्दतीने करुन सुबकता शिकता येते. अनेक मुलं एकत्र आल्याने मुलांमधील एकीचे बळ वाढते. तसेच किल्ल्याचे संरक्षण आपली जबाबदारी आहे हे आपोआप बालमनावर रुजविले जाते. आजची परिस्थिती पहाता, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारसांचे जतन ही काळाची गरज निर्माण झाली आहे.

वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा आणि भाऊबीज या क्रमामध्ये सगळया धनसंपदा आरोग्य आणि विविध नात्याची प्रेमळ गुंफण दडलेली आहे. या प्रत्येक दिवसाचा आनंद त्या त्या दिवसाप्रमाणे घेणे, हीच खरी दिवाळी ! परंतु आजकाल दिवाळी सणाला काहीसे भडक स्वरुप आले आहे. अनावश्यक खरेदी, फटाक्यांचा धूर आणि आवाज यामध्ये खरी दिवाळी हरवत चालली आहे.

दिवाळीचा सण साजरा करीत असताना, फटाक्यांमुळे निर्माण होणारे आवाज व वायुप्रदुषणाबाबत विचार होणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचा मोठया प्रमाणात प्रतिकूल परिणाम सर्व सामान्य मनुष्य / प्राणीमात्रांवर होत असल्याचे सर्वांना जाणवत आहे. उदा. तापमानातील वाढ, समुद्र किना-यांवरील नैसर्गिक आपत्ती, ध्वनी प्रदुषणातील वाढ इत्यादी यामुळे सर्वांचे जीवन सुखमय होण्याऐवजी दुःखमय होताना, ताण तणावामध्ये व्यतित करीत असल्याचे सर्वांना जाणवत आहे. फटाके वाजविल्यामुळे निर्माण होणा-या ध्वनी प्रदुषणाचे होणारे दुष्परिणाम दूरगामी असल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम हा घरातील लहान व वृध्द व्यक्तींच्या शरीरावर तसेच रुग्णालयातील आजारी रुग्णांवर होण्याची शक्यता असते. त्यातून विविध जीवघेणे आजार अथवा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळी सुखमय व मंगलमय, आनंददायक होण्यासाठी आपण आज परिवारातील बंध दृढ करुन स्वत:च्या आरोग्याची परिवाराची आणि सामाजिक स्वास्थ्याची काळजी घेण्याचा संकल्प करुया.

या संकल्पाबद्दल तसेच दिवाळी या सणाच्या आपल्या आयुष्यातील महत्वाबद्दल आपल्या विदयार्थ्यांना समजावून त्यांच्याकडून घरातील व्यक्तींचे मार्गदर्शनपर उद्दबोधन झाल्यास व विदयार्थ्यांनी स्वतः ठरविल्यास फटाके वाजवण्यावर मर्यादा येऊन विविध त्रास / आजार व प्रदुषण होणार नाही. याकरिता आपल्या स्तरावरुन शाळेतील मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आपणांस याव्दारे करीत आहे.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.