सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमधून स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत. Cleanliness fortnight

सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमधून स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत.


लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था ओरंगाबाद मिपा च्या संचालक डॉ वैशाली पवार यांनी सूचित केले आहे कि....

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये शालेय शिक्षण व साक्षरता विभाग हा राज्य शासन व केंद्रशासित प्रशासन यांच्या समन्वयाने सन 2016 पासून प्रत्येक वर्षी स्वच्छता पंधरवडा साजरा करत आहे. दरवर्षी या विभागाचा स्वच्छता पंधरवडा लाखो मुले आणि समाजातील सदस्यां व्यतिरिक्त इतर कार्येकर्ते यांचा समावेश असलेली एक जनतेची यशस्वी चळवळ बनली आहे व तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या द्वारे, स्वच्छतेबाबत केलेल्या उत्तम कार्याचा गुणगौरव करण्यात येत आहे.

कॅबिनेट सचिवालय, भारत सरकार आणि जलशक्ती मंत्रालय, पेयजल व स्वच्छता विभाग (DDWS) यांनी प्रसारित केलेल्या वर्ष 2023 च्या स्वच्छता पंधरवडा दिनदर्शिकेनुसार भारतासाठी स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची अंमलबजावणी दि.1 ते 15 सप्टेंबर,2023 या कालावधीत करावयाची आहे. लक्षवेधी सहभागासाठी योग्य पध्दतीने स्वच्छता पंधरवडा साजरा करुन विद्यार्थी, शिक्षक व समाज यांचा सक्रीय सहभाग घेवून साफसफाई, स्वच्छता व आरोग्य आणि शाळेतील इतर संबंधित उपक्रमांची अंमलबजावणी शाळा/संस्था यांनी करण्याकरीता सूचित करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी आपल्या जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी द्यावी. सदर नोडल अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत / संस्थेत सदर स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शाळांना या पत्रातील सूचना देण्यात याव्यात.

सूचना खालील प्रमाणे.......

1. सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमधून स्वच्छतेची शपथ घेण्याकरिता विद्यार्थी शिक्षक/कर्मचारी यांचा सहभाग घेण्यात यावा.

2.स्वच्छता पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात शालेय व्यवस्थापन समिती / पालक शिक्षक संघ तसेच पालक व शिक्षक यांच्या बैठका घेण्यात याव्यात व या बैठकांमध्ये साफ सफाई व स्वच्छतेचे महत्व निर्दशनास आणून द्यावे व तसेच शाळेत व घरी आरोग्य व स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रूजविण्याबाबत प्रोत्साहित करुन प्रेरणा देण्यात याव्यात.

3.शिक्षकांनी शाळेतील/संस्थेतील स्वच्छता विषयक सुविधांची तपासणी करुन गरज भासल्यास त्या सुविधांची दुरुस्ती व देखभाल यासाठीची योजना तयार करावी.

4. जिल्हा / गट / केंद्र या स्तरावर स्वच्छतागृह व स्वच्छ शालेय परिसर या विषयी स्पर्धांचे आयोजन करावे.

5.शाळेतील स्वच्छता व आरोग्यविषयक सवयी याबाबत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा / प्रश्न मंजुषा / घोषवाक्य / कविता लेखन या स्पर्धांचे आयोजन करावे.

6.विद्यार्थी,शिक्षक व पालक यासाठी चित्रकला स्पर्धा / प्रतिकृती निर्मिती स्पर्धा आयोजित करावी.

7. स्वच्छता या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करावी.

8.शाळा व संस्था यांच्या संकेत स्थळांवर स्वच्छतेच्या जागृतीचे संदेश अपलोड करावे व शाळेत स्वच्छतेवरील छायाचित्रे प्रदर्शित केले जावेत.

वरील सहयोगी उपक्रमाशिवाय शिक्षक आणि शाळा प्रशासन यांच्या करिता खालील उपक्रमही हाती घेण्यात यावेत.

1.विहित नियमानुसार अनावश्यक जुने रेकॉर्ड व अनावश्यक फाईल्सचे निर्लेखन करणे आणि त्यांच्या नोंदी ठेवणे.

2. सर्व प्रकारचे खराब साहित्य, जसे की मोडकळीस आलेले फर्निचर, वापरात नसलेली सामग्री, निकामी वाहने इ. शाळा / संस्थेच्या परिसरातून पूर्णपणे काढून टाकून योग्य कार्यपध्दतीनुसार निकाली काढावीत.

3.शाळेच्या आवारात एकेरी वापरातील प्लास्टीकवर बंदी घालणे, प्लास्टिक वापरातून होणाऱ्या प्रदुषणाबाबत जागरुकता निर्माण करणे तसेच 3R - कमीवापर, पुनरवापर आणि पुनर्चक्रिकरण या तत्वाबाबत जागरुकता निर्माण करावी.

4.स्थानिक प्रतिनिधीच्या सहकार्याने शिक्षक आणि विद्यार्थी यांनी जवळच्या परिसरातील नागरिक, स्वतःचे कुटूंब,शेजारी यांचेकडे स्वच्छता पंधरवडा या विषयाचा प्रचार करावा.

5.शालेय परिसरात वारंवार वापरल्या जाणाऱ्या साहित्याची दररोज स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.

स्वच्छता पंधरवडा या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी व सामुहिक जाणीव निर्माण करण्यासाठी खालील उपक्रम हाती घ्यावेत.

अ) स्वच्छता आणि जलसंवर्धनाबाबत दृकश्राव्य कार्यक्रम / IEC साहित्याची निर्मिती करुन विद्यार्थी, शिक्षक व इतरांना प्रेरीत करावे.

ब) स्वच्छता पंधरवडा ठळकपणे निदर्शनास आणण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फलकाची / बॅनरची निर्मिती करुन ते फलक शाळा / तालुका/जिल्हा/विभाग/राज्याच्या संकेत स्थळावर ते अपलोड करावेत. सामाजिक माध्यमाचा व इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मिडीया चा वापर करुन स्वच्छता पंधरवड्याची जाहिरात देवून जनजागृती निर्माण करण्यात यावी.

स्वच्छता पंधरवडा, 2023 करिता सूचविलेली कार्य योजना (दि.1 ते 15 सप्टेंबर, 2023) सोबत जोडत आहोत. दि.1 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा कृती आराखड्याप्रमाणे मनापासून विद्यार्थी, शिक्षक, पालक स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आपण त्यानुसार COVID-19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी दिलेल्या आरोग्य व स्वच्छता विषयक सूचनांचे पालन करण्यासंबंधी सर्व शाळा / शैक्षणिक संस्था यांना आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात.

स्वच्छता पंधरवडा यशस्वी होण्याकरीता आपण आपल्या जिल्ह्यातील स्वछता पंधरवडा कालावधीत सहभागी होणाऱ्या शाळा व विद्यार्थ्यांची संख्या तसेच दररोज स्वच्छता पंधरवडा बाबतचे ठळक वैशिष्ट्यासह दररोज (दिननिहाय) छायाचित्रे, व्हिडीओ चित्रफित इत्यादी https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड करण्यात यावेत. सर्वोत्तम सादरीकरण करणारे राज्य / केंद्रशासित प्रदेश / संस्था यांना त्याच्या स्वच्छता पंधरवड्यातील सहभागावर आधारित बक्षीस ही दिले जाणार आहे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत सूचविलेले सर्व उपक्रम नियमित, वर्षभर एकात्मिक पध्दतीने सतत शाळां व संस्थांमध्ये सुरु रहावेत यासाठी प्रोत्साहन द्यावे.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.

download click here


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.