शाळेतील दि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत

 शाळेतील दि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पटावर  असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत  


शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी व शिक्षण संचालक माध्यमिक संपत सूर्यवंशी यांनी दि ७ जून रोजी पत्रीपत्रक काढून सूचना केल्या आहेत कि.....

सरल प्रणालींतर्गत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पध्दतीने एनआयसी, पुणे यांच्या मार्फत करण्यात येतात. त्यानुसार संदर्भाधिन शासन निर्णय दिनांक ०६/०२/२०२३ शासन पत्र दिनांक २३/११/२०२२ मधील तरतुदीनुसार दिनांक ३०/११/२०२२ रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यापैकी दिनांक १५/०६/२०२३ अखेर आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२२-२३ ची संच मान्यता अंतिम करण्यात येणार आहे.

सध्यस्थितीत किमान ८० % विद्यार्थी वैध विचारात घेवून अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत, शाळांकडून विद्यार्थी वैध करण्याची कार्यवाही योग्य प्रकारे सुरु आहे. पंरतु विद्यार्थ्याच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा कांही विद्यार्थ्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यामुळे शाळेतील सन २०२२-२३ च्या मंजुर पदावर विपरित परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्याच्या नावाच्या यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबंधित गटशिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यापैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्याची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील.

विद्यार्थ्याची पडताळणी करताना खालील बाबीची खात्री करावी.

१. नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत अशा विद्यार्थ्याची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शाहनिशा करुन असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.

२. ज्या विद्यार्थ्याची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची तसेच त्यांचे आधार कार्ड का तयार होवू शकले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राहय धरण्यात यावेत.

३. शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट (Duplicate) असल्याचे स्टुंडट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे याची क्षेत्रीय यंत्रणेकरुन खात्री करुन योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्याची नोंद करावा.

४. शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी समक्ष भेट देवून अर्ज केलेल्या विद्यार्थ्याची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेला प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री करावी.

५. ज्या शाळांची किमान ९० टक्के विद्यार्थी शाळांनी वैध केलेले आहेत, त्याच शाळांतील उर्वरित विद्यार्थ्याबाबतची त्यांच्या अडचणी लक्षात घेवून पडताळणी करण्यात यावी.

६. आधार इनव्हॅलीड / अनप्रोसेसड/आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेवून खात्री पटल्यानंतरच त्यास संच मान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावे.

आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर संबंधित शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवर सदर विद्यार्थ्याना संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत योग्य ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल अथवा सदर अहवालाच्या आधारे सदर विद्यार्थ्याना विचारात घेवून संच मान्यता सन २०२२-२३ करण्यात येतील.

वर नमुद केल्यानुसार शालेय विद्यार्थ्यापैकी ज्यांचे आधार अवैध ठरलेल्या व आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत योग्य ती खात्री करुन पढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक पहा.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .