आंतर जिल्हा बदली 2023 इतर महत्वाच्या बाबी
९) एकत्रित संवर्गनिहाय ज्येष्ठता सूची तयार झाल्यावर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे संवर्गनिहाय ज्येष्ठतेनुसार व विनंतीप्रमाणे करण्यात येईल. ज्या शिक्षकाची बदली करावयाची आहे, त्या शिक्षकाची बदली ज्या जिल्ह्यात होणे अपेक्षित आहे त्या जिल्हयात त्या प्रवर्गासाठी बदली वर्षामध्ये ३१ मे अखेर बिंदूनामावलीमधील सरळसेवेचे पद रिक्त असणे आवश्यक आहे. त्याच पदावर संबंधितांची बदली केली जाईल. कर्मचा-याने त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या जिल्हयात बिंदूनामावलीप्रमाणे थेटपणे वा सकृतदर्शनी पद उपलब्ध नसल्यास बदल्यांकरिता साखळी पध्दतीचा अवलंब करण्यात येईल व त्याद्वारे मागणी केलेल्या जिल्ह्यात पद उपलब्ध झाल्यास त्या पदावर संबंधित शिक्षकाची आंतरजिल्हा बदली केली जाईल.
१०) आंतरजिल्हा बदली विनंतीनुसार बदली असल्यामुळे यासाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी कर्मचा-यास अनुज्ञेय होणार नाही.
११) हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या कर्मचा-यांच्या आंतरजिल्हा बदलीस या शासन निर्णयातील तरतुदीमुळे बाधा पोहोचणार नाही.
१२) आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर संबंधित शिक्षकाने हजर झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
१३) आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषदांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी :
१३.१ दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व शिक्षकांच्या नियुक्तीच्या दिनांकानुसार सर्वप्रथम जेष्ठता याद्या तयार करण्यात याव्यात.
१३.२ यानंतर या यादीतील इच्छुक असलेल्या, शिक्षकांना आदिवासी व नक्षलग्रस्त भागात नेमणूक देण्यात यावी. इच्छुक नसल्यास कनिष्ठतम शिक्षकांना त्या भागात नेमणूक देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील सर्व जागा भरण्याबाबत कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
१३.३ त्यानंतर वरील जेष्ठतायादीतील इच्छुक शिक्षकांना अवघड क्षेत्रात नियुक्ती देण्यात यावी. कोणीही इच्छुक नसल्यास वा इच्छुकांची संख्या कमी असल्यास, सेवा जेष्ठता यादीनुसार कनिष्ठतम शिक्षकांना अवघड क्षेत्रातील रिक्त जागी नेमणूक देण्यात यावी.
१३.४ वरीलप्रमाणे रिक्त जागा संपूर्णतः भरल्यानंतर जिल्ह्यातील ज्या तालुक्यात रिक्त जागांची टक्केवारी सर्वाधिक आहे, अशा तालुक्यातील रिक्त जागा भरण्यात याव्यात. हे
करताना इच्छुक शिक्षकांना त्यांच्या जेष्ठतेप्रमाणे नियुक्ती देण्यात यावी व उरलेल्या रिक्त जागांवर नियुक्तीसाठी स्वेच्छेने कोणी मागणी करीत नसल्यास, अशा जागांवर समुपदेशनाने नेमणूका कराव्यात.
१३.५ अशाप्रकारे क्रमाने रिक्त जागांची, अधिक पासून कमी टक्केवारी असणाऱ्या तालुक्यातील जागा भरण्यात येतील.
१३.६ जिल्हा परिषदेमध्ये हजर होणाऱ्या शिक्षकांची आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी जेष्ठता याद्या तयार करुन दर मंगळवारी उपलब्ध रिक्त जागांवर त्यांची समुपदेशनाने पदस्थापना देण्यात यावी.
HTML
१४) आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषदांनी उपरोक्त मुद्दा क्र.१३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यापूर्वी विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही करावी.
१४.१ विशेष संवर्ग भाग - १ या संवर्गातील शिक्षकांना सर्वप्रथम प्राधान्याने समायोजनाने पदस्थापना देण्यात यावी. अशी पदस्थापना देताना पूर्ण जिल्हयात ज्या ठिकाणी बदलीने नियुक्ती देण्यास रिक्त जागा असतील (Clear Vacancy) त्या रिक्त जागेवर त्यांच्या सोईनुसार पदस्थापना देण्यात यावी म्हणजेच या संवर्गाला पदस्थापना देताना मुद्दा क्र. १३ मध्ये नमूद भरती करण्यात येणारे पदाचा प्राधान्यक्रम विचारात घेऊ नये.
१४.२ विशेष संवर्ग भाग - १ मधील शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर विशेष संवर्ग भाग - २ या संवर्गातील शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी. अशी कार्यवाही करताना आंतरजिल्हा बदलीने संबंधित जिल्हयात आलेल्या व्यक्तीचा जोडीदार त्याच जिल्हयात कार्यरत असल्यास अशा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना उपरोक्त मुद्दा क्र.१३ मध्ये नमूद सुचनेनुसार जी पदे प्राधान्याने भरणे आवश्यक आहे, अशा जागी त्यांना नियुक्ती द्यावी. या नियुक्तीने संबंधित शिक्षकाला त्यांच्या जोडीदारापासून ३० कि.मी. परिसरात नियुक्ती मिळत नसल्यास संबंधित शिक्षक व त्याचा जोडीदार जी पदे प्राधान्याने भरणे आवश्यक आहे, अशा पदावर दोघांना नियुक्ती द्यावी.
१४.३ विशेष संवर्ग भाग-२ या संवर्गातून आंतरजिल्हा बदलीने संबंधित जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीचा जोडीदार त्याच जिल्ह्यात कार्यरत नसल्यास अशा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग - १ मधील शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर विशेष संवर्ग भाग- २ या संवर्गातील शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी.
१५) जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत सुधारित धोरण निश्चित झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांची त्यांच्या पसंतीनुसार दिलेल्या जिल्ह्यात जरी आंतरजिल्हा बदली झाली तरी त्यांनी सदर जिल्ह्यातील बदली रद्द करण्याची विनंती केल्यानंतर त्यांच्या बदल्या रद्द करण्यास परवानगी देण्यात येते. यासंदर्भात खालीलप्रमाणे धोरण निश्चित करण्यात येत आहे .
१५.१ आंतरजिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यात रुजू होण्याबाबत कार्यवाहीसाठी १५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात यावा व सदर कालावधीत बदली आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
१५.२ आंतरजिल्हा बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकास ती बदली नको असल्यास, ती बदली रद्द करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना एक महिन्याच्या आत बदली रद्द करण्यासाठी अर्ज देणे आवश्यक राहील. एक महिन्यानंतर अशी बदली रद्द करता येणार नाही.
१५.३ बदली रद्द करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेताना त्या जिल्हा परिषदेमध्ये त्या संवर्गाची जागा रिक्त असल्याची खातरजमा करावी. अशा प्रकारे संवर्गाची जागा रिक्त नसल्यास बदली रद्द करता येणार नाही.
१५.४ आंतरजिल्हा बदली रद्द करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचाच असेल.
१५.५ आंतरजिल्हा बदली आदेश रद्द करणे, हा संबंधित शिक्षकाचा हक्क नाही. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचा निर्णय अंतिम असेल व त्या निर्णयाच्या विरुध्द विभागीय आयुक्त अथवा शासनाकडे अपील / विनंती करता येणार नाही.
१५.६ अशा शिक्षकांना नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या निवडीच्या प्रवर्गाची जागा रिक्त असल्यास त्यांची मूळ जिल्हा परिषदेत नियुक्ती कायम ठेवण्यात येईल. परंतू यापुढे आंतरजिल्हा बदलीने झालेली बदली रद्द करुन त्यांच्या मूळ जिल्हयात परत जाण्याची विनंती करणा-या शिक्षकांना त्यांच्या संवर्गातील सेवाज्येष्ठता गमवावी लागेल. आंतरजिल्हा बदली रद्द करुन जे शिक्षक त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेत जातील अशा शिक्षकांची त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये फेरनियुक्ती गृहीत धरुन त्यांना सेवाज्येष्ठतेमध्ये सर्वात कनिष्ठ जागी दर्शविण्यात येईल.
१५.७ जे शिक्षक आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर सदर बदली रद्द करतील त्या शिक्षकांना पुढील पाच वर्षाच्या कालावधीत आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
१६) पहिल्या आंतरजिल्हा बदलीस ५ वर्षाचा कालावधी झाल्यानंतर दुसऱ्यांदा आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येईल.
१७) आंतरजिल्हा बदलीसाठी शासन स्तरावर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच अन्य मार्गाने दबाव आणल्यास अशा कर्मचा-यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
१८) आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्राच्या सत्यतेबाबत काही तक्रारी असल्यास अशा तक्रारींची मुख्य कार्यकारी अधिका-यांनी शहानिशा करुन निर्णय देण्यात यावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल.
१९) आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यांच्या काही कारणास्तव तक्रारी असल्यास अशा कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागीय आयुक्त, यांचेकडे तक्रारी कराव्यात. संबंधित विभागीय आयुक्तांनी तक्रार प्राप्त झाल्यास प्रकरणपरत्वे तक्रारीची शहानिशा करुन ३० दिवसात निर्णय घ्यावा. विभागीय आयुक्त यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल. आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .