आंतर जिल्हा बदली 2023 सर्वसाधारण माहिती, नियम व अटी

 आंतर जिल्हा बदली 2023 सर्वसाधारण माहिती, नियम व अटी  


शासन निर्णय दि २३ मे २०२३ नुसार.....

उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे.

१) महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवा प्रवेश), नियम १९६७ मधील ६(८) मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक देण्यास व बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासही संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत.

२) आंतरजिल्हा बदलीसाठी विचारात घ्यावयाच्या बाबी :-

२.१ ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आंतर जिल्हा बदली हवी आहे, अशा शिक्षकांची संबंधित जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या ३१ मे अखेर किमान ५ वर्ष सलग सेवा होणे आवश्यक आहे. तसेच तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक आहे. या ५ वर्षाच्या कालावधीत संबंधित शिक्षकाच्या शिक्षण सेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाईल. विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा ३ वर्षाची असेल.

२.२ मात्र आंतरजिल्हा बदली हा संबंधित शिक्षकांचा हक्क असणार नाही.

२.३ जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत / किंवा प्राथमिक पदवीधर पदावर पदस्थापना झाल्याने वेतनोन्नती झाली असल्यास अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास स्वखुशीने पदावनत करण्याबाबत तसेच वेतनोन्नती परत करण्याबाबत संमतीपत्र दिल्यानंतरच त्या शिक्षकांचा आंतरजिल्हा बदल्यांसाठी विचार केला जाईल.

२.४ ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर (बिंदू नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिले आहे, अशा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होईल.

२.५ आंतरजिल्हा बदली प्रकरणांत ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर (बिंदू नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली नाहीत, अशा जिल्हा परिषदेमध्ये फक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली साखळी पद्धतीने होईल.

२.६ यासंदर्भात आंतरजिल्हा बदलीस इच्छुक असलेल्या शिक्षकांनी अर्ज करतांना जास्तीत जास्त चार जिल्हा परिषदांची निवड करण्याची मुभा राहील. याकरिता त्यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

२.७ प्रत्येक वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी शासनाद्वारे निर्देशित केलेल्या विशिष्ट कालावधीत संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्जाचा नमुना सोबतच्या परिशिष्टामध्ये जोडलेला आहे. या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत.

"संबंधित शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून काही न्यायालयीन / लोकायुक्त / अन्य न्यायाधिकरण / सक्षम प्राधिकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास त्या आदेशाची प्रत अर्ज भरताना गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात यावी व त्यावर मुळ याचिकेची प्रत देखील उपलब्ध करून देण्यात यावी.

२.८ सदरच्या बदल्या ह्यापूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार १०% पेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही... जिल्ह्यातुन बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

२.९ सदरची आंतरजिल्हा बदली करताना संबंधित शिक्षकांच्या नियुक्ती प्रवर्गानुसार बदलीने जाण्याच्या जिल्हा परिषदेत रिक्त पद असल्यास, त्या रिक्त पदावर बदली करण्यात येईल.

३) न्यायालयीन/लोकायुक्त / अन्य प्राधिकरण / सक्षम प्राधिकरण यांच्या आदेशाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद एकत्रित करून पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवतील. ज्या आदेशाची अंमलबजावणी झालेली आहे अशा आदेशाच्या प्रती शासनास पाठवू नयेत.

४) वरील प्रकरणांबाबत सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढण्यात येतील.

५) नवीन धोरणानुसार ना हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याने, आंतरजिल्हा बदलीसाठी यापुढे जिल्हा परिषदांकडून ना हरकत दाखला देण्यात येणार नाही.

६) आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेतून सामावून घेतलेल्या कर्मचाऱ्याची सेवाज्येष्ठता अशा बदलीनंतर जिल्हा परिषदेत हजर झाल्याच्या दिनांकानुसार निश्चित करण्यात येईल. एकाच दिवशी एकापेक्षा अधिक शिक्षकांना सामावून घेताना त्यांची जेष्ठता त्यांच्या जन्मदिनांकानुसार ठरविण्यात यावी.

७) संबंधित कर्मचाऱ्याविरूद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित अथवा चालू असल्यास सदर कर्मचारी आंतरजिल्हा बदलीस अपात्र समजण्यात येईल.

क्रमशः

अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय वाचा. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.