रमेश बळकटे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

 




रमेश बळकटे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

अकलूज : दि ५ (प्रतिनिधी)

                  जिल्हा परिषदेच्या महाळुंग केंद्रीय आदर्श शाळेचे  मुख्याध्यापक रमेश शिवराम बळकटे यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान सोहळा अकलूज येथील अन्नपूर्णा सांस्कृतिक भवन येथे नुकताच उत्साहात पार पडला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी सांगलीचे माजी शिक्षणाधिकारी आर जी पाटील, सोलापुरच्या उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे ,माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख , माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम डी नकाते,शंकरराव मोहिते साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र सावंत पाटील,डॉ.हरिश्चंद्र सावंत पाटील,व विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
                  रमेश बळकटे हे २९ वर्षे पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात सेवा करून निवृत्त झाले.त्यांनी २४ वर्षे  वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट काम केले.त्यांनी सुरवातीची ५ वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली.त्यानंतर मुख्याध्यापक म्हणूनच संपूर्ण सेवा केली.मुख्याध्यापक म्हणून प्रथम त्यांची गणेशगाव येथे नियुक्ती झाली. खऱ्या अर्थाने मुख्याध्यापक म्हणून त्यांनी दत्तनगर अकलूज या शाळेत ठसा उमटवला. त्यांनी दत्तनगर-अकलूज ही शाळा राज्यातील पहिली पार्टेक्स युक्त कार्यालय असणारी शाळा म्हणून राज्यात नावारूपास आणली.शाळेची संपूर्ण रंगरंगोटी, डिजिटल वर्ग,भौतिक सुविधा,विद्यार्थी गुणवत्ता विकास करून शाळा नावारूपास आणली.त्यावेळी राज्यातील व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी देऊन शाळेची वाहवा केली.तत्कालीन अकलूजचे सरपंच भैय्यासाहेब मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन दत्तनगर शाळेस लाभले. चांगल्या शिक्षक वर्गाची देखील मदत त्यांना झाली.त्यांच्या या चांगल्या कामाची दखल घेऊन जिल्हा परिषदेने त्यांचा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार देऊन गौरव केला.त्यानंतर त्यांची बदली महाळुंग केंद्र शाळेत झाली. केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून महाळुंग शाळेतही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून ५ वर्षे व मुख्याध्यापक म्हणून तब्बल २४ वर्षे अशी एकूण २९ वर्षे उत्कृष्ट शिक्षण सेवा केल्याबद्दल ,सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी बोलताना विविध मान्यवरांनी बळकटे सरांच्या जीवनातील आठवणी सांगितल्या व सरांच्या शैक्षणिक कामकाजा विषयी गौरवोउद्गार काढले.बळकटे सरांनी देखील काही जुन्या आठवणींना उजाळा देऊन सर्वांचे आभार मानले.
              या सत्कार सोहळ्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल काही शिक्षकांचा देखील विजयसिंह मोहिते पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.या दैदीप्यमान सोहळ्याचे देखणे नियोजन अकलूज मधील शिक्षक मित्र परिवाराकडून करण्यात आले होते.कोविड चे सर्व नियम पाळून अकलूज परिसरातील, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सेवापूर्ती निमित्ताने शिक्षक मित्र परिवाराने बळकटे सरांचा सपत्नीक सत्कार केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश नलवडे यांनी केले.तर सूत्रसंचालन सुहास उरवणे व राजाराम गुजर यांनी आपल्या ओघवत्या वाणीने करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.नितीन बनकर,श्रीकांत राऊत व त्यांच्या टीम ने कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.अशा प्रकारे उत्कृष्ट शैक्षणिक कामकाज पार पाडून सेवा निवृत्त होणाऱ्या रमेश बळकटे सरांचे सेवापूर्ती सत्कार सोहळ्या निमित्ताने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.